आयुष्याच्या एका टप्प्यावर लक्ष्मीपूजनाचा अर्थ वेगळा जाणवू लागतो. जे मिळवायचे आहे ते मिळवून झाले आहे, तरीही आपण काही ना काही मागत असतो, हेही जाणवते. मग प्रश्न पडतो, की आपल्याला नक्की काय हवे आहे? जे सतत मागतो आहोत, त्यामध्ये तरी खरे समाधान आहे का? विचार केल्यावर लक्षात येते, जे आहे ते सारे तिचेच आहे. आपण फक्त निमित्तमात्र. आता शोध घ्यायचा तो त्यातील समाधानाचा. नीलिमा हिरवे लक्ष्मीपूजन, वातावरणात वेगळीच मंगलता असते. नेहमी थंडीत येणारी दिवाळी आणि आता दिवाळीतही पावसाळा काहीशी अशी स्थिती असली, तरी उत्सवाचा उत्साह तसाच असतो. घरातील सगळी आवराआवर झाली. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त पाहून झाला. मस्त चहा घेऊन तयारीला लागले. पाटावर सुंदर रांगोळी रेखाटली, तांदूळ ठेवले, त्यावर चांदीची वाटी, तबक ठेवले, सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने आणि नाणी, नोटा अशी जय्यत तयारी केली. अगदी न विसरता केरसुणी आणली. झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरणे लावली, धूप, निरांजन चालू ठेवले. दाराबाहेर पणत्यांची रांग सजली. या मंगलमय, सुगंधीत वातावरणाने नेहमीचे कोंदटलेले माझे घर, मला लख्ख 'शोरूम पिस' वाटू लागले. आपल्या सणांचे हेच महत्त्व आपल्या आताच्या आयुष्यात आहे. लक्ष्मीपूजनाने आर्थिक व्यवहारातील सचोटी, नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता, अशी दोन मूल्य मनात रुजतात असे म्हणतात. श्रीलक्ष्मी! हिचे वर्णन ते काय करू? पती साक्षात विष्णू नारायण. तिला विष्णुप्रिया, पद्मा, सुवर्णा, हरिणी, हिरण्यवर्णा, पद्मवर्णी, पिंङ्गला, पद्मिनी, नित्यपुष्टा या नावांनी देखील ओळखले जाते. या लक्ष्मीला 'श्री' म्हणतात म्हणजेच समृद्धी, आनंद, वैभव. लक्ष्मीची पूजा करण्यासाठी मीदेखील लक्ष्मीसारखी सजले. माझ्या आयुष्यातील वैभवाच्या देवीची पूजा. खूप आनंदात होते मी. मागच्या लक्ष्मीपूजनास ठरविले होते, की वर्षभरात सोन्याचा लक्ष्मीहार घेईन आणि पूजेत ठेवून मगच घालेन.… आज लक्ष्मीहार माझ्यासमोर तबकात लखलखत होता. अगदी लक्ष्मीसारखा! …स्वप्नांची न संपणारी लकेर एक एक स्वप्नपूर्ती करत नवीन स्वप्ने उभी करत राहते. गेली १० वर्षे दर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एक, असे माझे दहा दागिने तयार झाले आहेत. आज हे मोठे घर आहे, गाडी आहे. सगळे आहे. काही नाही असे नाही. खरोखरच आजच्या लक्ष्मीपूजन मला काहीतरी नवीन खुणावत होते. लक्ष्मीचे आवाहन केले, प्रतिष्ठा केली आणि उत्तम पूजन केले. निरांजन, समई, उदबत्ती, धूप, फुल, वातावरण पवित्र झाले. लक्ष्मी मातेला नमस्कार करून एवढेच म्हणाले, की मला सुखसमृद्धीत ठेव. त्याक्षणी 'सुख' या शब्दाने विचारांच्या अश्वावर उडी मारली. माझ्या मनामध्ये जेथे वाट सापडेल तिकडे धावत सुटले. या सुखाने माझे ऐश्वर्य, धनधान्य, बँक बॅलन्स, साड्यांची आरास, दागिन्यांची गर्दी सगळे सगळे क्षणात पाहिले. मला मात्र माझ्यामध्ये कुठेच सुख दिसत नव्हते, असे जाणवले. या ऐश्वर्याच्या पलीकडच्या लक्ष्मीचा शोध मला घ्यायचा होता. कित्येक वर्षे दिवसरात्र अखंड धावणारे असे माझे आयुष्य. लग्नानंतरची अगदी नाजूक आणि साऱ्यांना पडणारी स्वप्न, आम्ही अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केली. स्वतःचे टुमदार घर, गाडी, उत्तम नोकरी, गलेलठ्ठ पगार सगळे सगळे पार पडले. खूप पळापळ केली, कित्येकवेळा मन मारून राहिले; पण या कष्टाने ही लक्ष्मी फळाला आली. आज सगळे काही अवतीभोवती असूनही या वैभवात कोरडेपणा जाणवू लागला आहे. उच्चभ्रू सोसायटीमधील घर असूनदेखील, माणुसकीची सधनता कोठेच दिसत नाही. चारचाकी गाडीतून फिरताना प्रदूषणापासून नक्कीच दूर आहे. येता-जाता अनुभवलेली माणसे सिग्नलला फक्त न्याहाळली जातात. कामाच्या पसाऱ्यात चहा-भजीचा बेत आखून मित्रमंडळी घरी निवांत बसली आहेत, असे माझ्या घराने कधी पाहिलेच नाही. आता वाटते, एवढी पैठणी नेसून, एवढे दागदागिने घालून मी जिची पूजा केली, ती येथे कुठे दिसतच नाही. हे लक्ष्मी, माझ्या वैभवातून तू मला एवढी मूर्तरूप दिसत असतानाही, मनातून जाणवत का नाहीस? विचारांचा गुंता वाढत चालला होता. आठवड्यातून तीन दिवस मला कामासाठी गाडी घेऊन पुण्याबाहेर जावे लागते. या प्रवासात मला अनेक लहानलहान गावे आवर्जून साद घालतात. या गावांमधील छोटी छोटी साधी घरे, वस्त्या, शेती, जनावरे यांकडे मी कायम ओढली जाते. क्षणभर विसावते देखील. या साध्या माणसांमधील मायेचा ओलावा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. दिवसभर उन्हात बिनाचप्पल राबलेली आणि घामाने डबडबून काळवंडलेली एखादी सखूबाईसुद्धा त्याक्षणी मला माझ्यापेक्षा जास्त तेजस्वी वाटते. मग वाटते लक्ष्मी माझ्याकडे की तिच्याकडे आहे? आज तिच्या घरीदेखील लक्ष्मीपूजन झाले असेल. तिनेही पूजा केली असेल. दारापुढील दोन पणत्यांच्या प्रकाशातही तिच्याकडे ही लक्ष्मी तेजाने उजळून निघाली असेल. विचारांची वावटळ कमी झाली… आणि जाणवले, मी लक्ष्मीसमोरच बसून होते. या लक्ष्मीमातेबरोबर सुख येते आहे; पण समाधानाचे काय? ते आपल्याकडे येतच नाही. आहे त्यातही समाधानी असणे, ही वृत्ती आता खुंटत चालली आहे. पैसा नावाच्या भस्मासुराने साऱ्या मानवी जीवनावर अधिराज्य केले आहे, असे वाटू लागले आहे. मानवी मन आणि बुद्धीला आपल्या प्रभावाने काबीज केले आहे. चलन हे माध्यम न राहता चालक बनले आहे. सगळ्या सुखांच्या परिपूर्णतेसाठी पैशाशिवाय दुसरे काही नाही, असाच मानस सगळीकडे दिसून येतो. यामुळे सुखाची व्याख्या बदलली आहे. जेथे सुखच बदलले, तेथे समाधान दिसेनासे झाले आहे, असे वाटू लागले आहे. दिव्यावरची काजळी पुसावी, तसे काहीसे झाले आणि सारे सारे लख्ख दिसू लागले. कितीही भरली तरी आमची झोळी रिकामीच…. या लक्ष्मीपूजनाला मला समाधानालाच नांदवायचे आहे. जे माझे आहे ते मिळाल्यावर, तिने अधिक दिलेल्याचे वाण मी समाजासाठी देण्याचे ठरविले. पैशामागे अखंड पळत सुटलेल्या लाखो माणसांच्या नशिबी ही पद्मनना, पद्मप्रिया, कमला, विष्णूप्रिया, जगदीश्वरी, कधी प्रसन्न होणार? गरज आणि हौस यांचा सुवर्णमध्य गाठायचे ठरविले आहे. हे महालक्ष्मी तूच समाजाला जागे करण्याची वेळ आता आली आहे. संपत्तीचा अपव्यय टाळला पाहिजे, गरजांची वाढती भूक आणि जवळ असणारी तू याचा मेळ बसेनासा झाला, की आर्थिक जुळवाजुळव कोलमडून पडते. यातूनच नैराश्य, एकटेपणा, चिडचिड, व्यसनाधीन होणे आणि सरतेशेवटी आत्महत्या यांकडे माणूस ओढला जातो आहे. हे लक्ष्मी, तू मला भरभरून दिले आहेस, हे कधी माझ्या लक्षात आले नाही. माझ्याकडे जे आहे, त्यातून माझी गरज भागल्यावर राहणाऱ्या पुंजीतील काही भाग समाजासाठी द्यायचे मी ठरवते आहे. या माझ्या सत्पात्री दानावर तूझी भरभरून कृपा असू दे. माझ्या रोषणाईच्या झगमगाटातील चार दिवे त्यांच्या आयुष्यात प्रकाश नक्कीच निर्माण करतील. महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहिले. संकल्पाचे अर्घ्य सोडले. हात जोडून, डोळे मिटून मी प्रार्थना केली, 'हे देवी, जे आहे ते तुझेच आहे… जे देशील तेही तुझेच आहे… मी 'माझे' म्हणून काय करू? अंबे, तुझे तुझ्याच चरणी अर्पण...'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट