Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

भाऊबीज : भावाची, ताईची

$
0
0

भाऊ आणि बहिणी हे नाते लहानपणापासून अनुभवलेले. कधीतरी त्याच्यावर ताईगिरीही केली आणि स्वत: ताईच्या मागे लपले. आज आम्ही भावंडे वेगवेगळ्या शहरांत असलो, तरी एकमेकांसाठी कायमच उपलब्ध आहोत, हा विश्वास, ही जाणीव मनात पक्की आहे. भावाप्रमाणे ताईदेखील खूप महत्त्वाची असते. न बोलता ती खूप काही देत असते, हे ती सासरी गेल्यानंतर जास्त जाणवते.

शिवानी पांढरे

एखाद्या मुलीच्या आयुष्यात पहिला मित्र, पहिला मुलगा, पाहिला जपणारा, जीव लावणारा आणि तेवढाच खोडी काढणार, प्रत्येक गोष्टींसाठी भांडणारा असा एकच येतो, तो म्हणजे भाऊ. सगळ्या पहिल्या गोष्टी आपण त्याच्यासोबत करतो. मोठा असो की लहान, भाऊ हा भाऊच असतो. याच भावाबद्दल प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी दोन सण असतात, राखीपौर्णिमा आणि भाऊबीज. हे दोनच दिवस नव्हे, तर भाऊ नेहमीच पाठीशी उभे असतात. तो आपली प्रत्येक भूमिका नेटकेपणाने निभावतो. आम्ही सगळ्या बहिणी भावप्रती असलेले प्रेम नेहमी व्यक्त करत असतो. हे सगळे भाऊ पडद्याआड राहून, सगळ्या भूमिका चोख पार पाडत असतात.

आम्ही भावंडे वेगवेगळ्या शहरांत राहतो. शिक्षण, नोकरी यांमध्ये सगळे गुंतलेले आहेत. आमचा रोज फोन होत नाही, की फार बोलणेही होत नाही. असे असले, तरी ते सारे पाठीशी आहेत, ही भावना नक्कीच मनात असते. लहानपणी आम्ही दोघे एकाच शाळेत शिकायचो. एकदा भावाला एक मुलाने जोरात मारले. त्यावेळी मी मोठी बहीण म्हणून, ज्या मुलाने त्याला मारले होते, त्याला मागचापुढचा विचार न करता मी मारून आले होते. आता भूमिका बदलल्या आहेत. लहानपणी मी त्याचा पाठीशी असायचे आणि आता तो माझ्या पाठीशी असतो. शिवाय आमची नावेही सारखीच आहेत, शिवा आणि शिवानी. लहानपणापासून सोबत राहिल्यामुळे, आम्हाला दूर राहायची सवय नव्हती. आम्ही एकमेकांशिवायचा विचारच करू शकत नव्हतो. एकेकाळी प्रत्येक गोष्टींसाठी भांडणारे आम्ही, आता प्रत्येक गोष्ट पाहून आठवण काढत असतो. तेव्हाची ती भांडणे, ती मारामारी, त्या खोड्या, याची किंमत तेव्हा रागात मोजली जायची. आता त्याची खरी किंमत कळते. भावा-बहिणीचे नाते हे समजण्यापलीकडचे असते. ते जपण्याचे असते.

एखादी बहीण जेव्हा मोठ्या भावाची कामगिरी बजावत असते, तेव्हा फार विशेष वाटते. जेव्हा ती आपल्यापासून दूर जाते, तेव्हा खरी तिची किंमत कळते. ती आणि मी सोबतच राहायचो आणि एके दिवशी ती लग्न करून सासरी निघून गेली. आपल्या आयुष्यात आईनंतर कोणी आपले असते, तर ती ताई असते. आता सगळे बदलले, तिचे लग्न झाले. ताईला सतत हाका मारणारी मी सुन्न झाले होते. आपल्या खोलीत ती नाही, हे मला खरेच वाटत नव्हते. ती सोबत आहे, असे मलाच वाटावे, म्हणून मी तिच्या पलंगावर चादर टाकून ठेवली होती. काळ पुढे सरकला आणि तिच्या शिवूचे रूपांतर शिवानीमध्ये झाले. तिच्या लहान शिवूला मोठे व्हावे लागले. अल्लड असणाऱ्या शिवूला समजूतदार आणि जबाबदार शिवानी व्हावे लागले. ती होती, तेव्हा शिवू उडायला घाबरत नव्हती. आता शिवानी झाल्यावर तिचे पंख जड झाले होते. ताई म्हणजे काय असते, हे तेव्हा मला जाणवायला लागले.

त्या दिवशी आमच्या खोलीमधली प्रत्येक गोष्ट परकी वाटत होती. ती माझ्याकडून स्वीकारली जात नव्हती. नेमके मला सगळे वयापेक्षा मोठी आणि खूप समजूतदार समजतात; त्यामुळे बऱ्याच गोष्टींना कुवत नसून सामोरे जावे लागले. त्या गोष्टींनी मला प्रत्येक वेळी कल्पनाशक्तीच्या बाहेर जाऊन जग ओळखायला आणि विचार करायला शिकवले. ठरवलं आपण आपले जगायचे. नवे राज्य निर्माण करायचे. हिशेब, खर्च, हिंडणे, फिरणे, मनमुराद हसणे, सेल्फी, रात्रीचे फिरणे हे सारे दूर गेले. कधी कधी हिशेब लागत नाही. फिरायला जायचे ठरवल्यास माणूस आणि जागा सापडत नाही. मुक्त बागडणे मी विसरलेच. आता काढलेले फोटो पूर्ण वाटत नाहीत. प्रत्येक फोटोमध्ये ताईची कमतरता जाणवते. रात्री उशीरा फिरणे सोडा, संध्याकाळी सहा वाजल्यानंतर बाहेर पडणे नको वाटते. आई नेहमी म्हणायची, मोठ्या झाडाखाली रोपटे कधीच वाढत नाही. हे वाक्य मी रोज अनुभवते. ती असताना मला कोणाची गरज वाटत नव्हती. ती सासरी गेल्यावर कळले, की समाज खूप मोठा आहे. रूममेट, मैत्रिणी सगळ्या परक्यासारख्या वागायला लागल्या. ती असताना सगळ्या छान राहत असत.

एक मात्र झाले. ताई सासरी गेल्यानंतर माझे आणि पुस्तकांचे छान नाते निर्माण झाले. रविवारी सगळ्या जणी कुठेतरी जातात. मी पुस्तकांच्या सफरीवर निघते. एक सांगते, पुस्तकाचे लग्न होत नाही. त्यामुळे ती मला सोडून सासरी जाणार नाहीत. भाऊबीज जेवढी भावासाठी आहे, तेवढीच ही ताईसाठीही आहे. ताई आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची असते. आपल्या पाठीशी ठामपणे उभी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>