Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

हिवाळ्यातील आहार

$
0
0

हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते; त्यामुळे या दिवसांत आहाराकडेही विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो.

पूजा शिरभाते

पहाटेची थंडी आता जाणवू लागली आहे. ऋतुबदलाची चाहूल शरीराला लागली आहे. ऋतू बदलला, की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलतात. पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते. या दिवसांत थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायलादेखील मदत होईल.

हिवाळ्याच्या आहाराचे नियोजन करताना, तो आहार पौष्टिक असेल; परंतु वजन वाढवणारा नसेल, याची सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते, त्याचबरोबर शरीराला ऊर्जेची गरजदेखील जास्त असल्याने भूक चांगली लागते. आपल्याकडे थंडीच्या दिवसात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू करायची पद्धत आहे. हे लाडू पौष्टिक असतात. प्रथिने, कॅल्शिअम व लोह हे सारे काही या लाडवांत भरपूर प्रमाणात असते. लहान मुलांना हिवाळ्यात नियमितपणे लाडू दिल्यास चालतात. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे, त्यांनी थंडीचा कडाका जास्त असतानाच लाडू खावेत.

थंडीत काहीतरी गरम घेतल्यावर चांगले वाटते. सारखा चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी हितकारक नाही. हर्बल टी किंवा ग्रीन टी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तुळस, गवती चहा, आले इत्यादींचा काढा घेणे फायद्याचे असते. नेहमीच्या चहात आले घालावे. या दिवसात भाज्यांचे सूप घेतल्यास भरपूर पोषकतत्त्वे मिळू शकतील. या दिवसांत भाज्या खूप चांगल्या प्रतीच्या व भरपूर प्रमाणात मिळतात. पालेभाज्यांचा तर हा सर्वोत्तम काळ आहे. त्यांचा वापर भरपूर करावा. हिरव्या भाज्यांमधील 'अ' आणि 'क' ही जीवनसत्त्वे थंडीत खाणेही चांगले आहे.

थंडीत मिळणारे लाल गाजर रोज घ्यावे. सॅलड, कोशिंबीर, सूप असे गाजराचे पदार्थ रोज करा. कधीतरी गाजर हलवा करता येईल. गाजरात 'अ' जीवनसत्त्व असते. हिवाळ्यात फळेदेखील छान मिळतात. विशेषत: संत्री, आवळा, डाळींब अशी एक ते दोन फळे आहारात असावीत. त्यातून जीवनसत्त्वे, खनिजे, चोथा व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक मिळतील. त्वचा व केसांचे चांगले पोषण होईल. योग्य प्रमाणात तेल व तूप आहारात असावे. बाजारातील तळलेले पदार्थ टाळावे. या दिवसांत काहींना सर्दी-खोकला जाणवतो, त्यावेळेला तेलकट पदार्थ व शीतपेये टाळणे चांगले.

आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतानाच, योग्य प्रमाणात पाणी पिण्याचीही काळजी घ्यावी. पचनासाठी पाणी आवश्यक आहे. हिवाळ्यात थंड तापमानामुळे सारखी तहान लागत नाही, म्हणून काही लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी होते. विशेष आठवण ठेवून पाणी प्यायले पाहिजे. हिवाळ्यात दिवस लहान असतो; त्यामुळे काहींचे वेळेचे व्यवस्थापन नीट होत नाही. थंडीत सकाळी लवकर उठावेसेही वाटत नाही. त्यामुळे व्यायामाचे नियोजन नीट होत नाही. व्यायाम करणे शरीराला आवश्यक आहे. आपण पौष्टिक पदार्थ खातो व पचनशक्तीही योग्य असते, तरीसुद्धा व्यायाम नसेल तर शरीराला या पोषकतत्त्वांचा योग्य वापर करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांनी करा व नियमित व्यायामदेखील करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>