चर्चेतील ती मोठमोठाल्या अवजड यंत्रांशी स्त्रियांचा संबंध फारसा येत नाही. त्या तुलनेने कमी बळाची कामे करतात; कारण त्यांची शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे, असे मानले जाते. हा समज फोल ठरविणारी पिढी जगाच्या पाठीवर तयार होत आहे. 'वेल्डिंग'सारख्या पुरुषी क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या या स्त्रिया आशेचे स्थान बनल्या आहेत. सुनीता लोहोकरे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, विशेषतः जर्मनीसारख्या पराभूत देशांमध्ये पुरुषांची जवळजवळ एक तरुण पिढीच नष्ट झाली. घरातील कमावते हातच नाहीसे झाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी या घरांमधील स्त्रियांकडे आली. घरातील आणि रोजगार क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी स्त्रिया मोठ्या संख्येने पुढे आल्या आणि त्यांनी पुरुषांची जागा भरून काढली. जी कामे पुरुषांची समजली जात होती, ती कामे स्त्रिया करू लागल्या. युरोपातील स्त्री जगतात ही एक प्रकारे अपरिहार्यतेतून झालेली क्रांतीच म्हणावी लागेल. असे असले, तरी आजही काही क्षेत्रांमध्ये पुरुषांचेच वर्चस्व असलेले दिसून येते. 'वेल्डिंग' हे त्यांपैकीच एक. फोर्ब्स मासिकाने नुकताच वेल्डिंग क्षेत्राचा कानोसा घेतला. त्यामध्ये मेगन हे नाव प्रामुख्याने घेण्यात आले आहे. पुरुषी समजल्या जाणाऱ्या या यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात मेगनने स्वतःची ओळख कशी निर्माण केली, याची माहिती घेणे खूपच रोचक आहे. मेगन अमेरिकेची. शाळेत असतानाच तिने वेल्डिंग या क्षेत्रात पुढे काम करावयाचे ठरवले होते. तेव्हा स्त्रियांचे काम आणि पुरुषांचे काम असा कोणता भेदभाव तिच्या मनातही नव्हता. केवळ हे एक दीर्घ काळ काम देणारे आणि चांगली प्राप्ती देणारे क्षेत्र आहे, एवढेच तिच्या डोक्यात होते. त्या काळात अशा प्रकारच्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्त्रिया पुढे येत नव्हत्या. २०१०च्या सर्वेक्षणानुसार वेल्डिंगमध्ये केवळ चार टक्के स्त्रिया कार्यरत होत्या आणि गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे आठ वर्षांच्या काळात त्यात केवळ एक टक्का वाढ झाली आहे. अशा स्थितीत मेगनला साथ लाभली ती तिच्या घरच्यांची. शिवाय हाताने काम करण्याची तिला जणू जन्मजातच आवड होती. आयोव्हाज वेस्ट हायस्कूलमध्ये तिने वेल्डिंग शिकायला सुरुवात केली. तेव्हाही वेल्डर ही स्त्री असू शकते, याची कोणाला सवय नव्हती. (आपणही मराठीमध्ये वेल्डर हा शब्द वापरताना तो पुल्लिंगीच असल्याचे गृहीत धरतो.) त्यामुळे एकीकडे वेल्डिंगचे काम शिकणे आणि दुसरीकडे त्यातील मानसिक अडथळ्यांवर मात करणे, ही दुहेरी जबाबदारी तिच्यावर आली. या परिस्थितीतही तिने स्वतःला सिद्ध केले. शिक्षण झाल्यावर तिने जॉन डीर डेव्हनपोर्ट वर्क्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे तिने नित्याचे काम करतानाच काही उत्सुक स्त्रियांनाही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांपासून ती प्रशिक्षणाचे काम करते आहे. आता तिच्यासमवेत आणि एक स्त्री वेल्डर काम करते. 'कामात झोकून द्या. संघर्ष करावा लागणारच आहे; पण काम करायचे थांबवू नका. शक्य तितक्या स्वावलंबी व्हा. अखेरीस तुम्हीच तुमच्या छान मित्र असता. स्वतःला सातत्याने सिद्ध करावे लागते; पण वेळ बदलत असतोच,' असे मेगन सांगते. 'वेल्डिंग हे कौशल्याची आवश्यकता असणारे क्षेत्र असल्यामुळे, जगभरात या क्षेत्रातील मागणी कायम वाढती राहणार आहे. हे काम संबंधित ठिकाणी जाऊनच करावे लागते; मात्र काम झाल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो. एखादा रोड ग्रेडर पाहिल्यावर हा आपण तयार केला आहे, याचा आपल्याला अभिमान वाटतो,' असे मेगन सांगते. रॅचेल मिलर ही मेगनसारखीच एक वेल्डर. ती अमेरिकेतील विमानतळावर वेल्डिंगचे काम करत असताना प्रकाशात आली. तिचे वडील ट्रक चालक होते. त्यामुळे लहानपणापासूनच तिची अवजड वाहने, यंत्रे आणि वेल्डिंगशी ओळख झाली. हे काम खूप कठीण, म्हणून या क्षेत्रात करिअर करायचे, असा विचारही तिच्या मनात आला नाही. पुरुषी, साधेसुधे कपडे घालून यंत्रांशी खेळत आपले हात खराब करून घेणे किती मुलींना आवडते? रॅचेलला मात्र हात खराब करून घेण्याचा अभिमानच वाटू लागला. खरे तर तिने अॅरिझोना विद्यापीठातून पदवी मिळवली होती. नंतर ती सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करायला लागली; पण त्यात तिला समाधान मिळेना. अखेरीस ती यंत्रांकडे वळली आणि वेल्डर म्हणून कामाला लागली. आपल्या कामाचा लेखाजोखा मांडणारे पुरुष असणार, ते पुरुष वेल्डरने केलेले काम आणि आपण केलेले काम याची तुलना करणार, याची तिला कल्पना होती. हीच तुलना तिला आणखी कष्ट करण्यास प्रेरणा देणारी ठरली. आपल्याला केवळ त्यांच्यासारखे चांगले काम करायचे नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक चांगले काम करायचे आहे, असा तिचा नेहमी निश्चय असतो. सुरुवातीला कामाच्या ठिकाणीही तिला भेदभावलाही सामोरे जावे लागले; कारण वरिष्ठांकडून 'कॉफी करून आण,' असा आदेश तिला दिला जाऊ लागला. वाईट वागणूक मिळू लागली. बऱ्याचदा तिला काम जमणार नाही, असे वाटून तिचे पुरुष सहकारी मदत करायला येत. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. नंतर तिने नोकरीही बदलली. गोर्बेल इंकमध्ये आता तिच्या समवेत आणखीही काही स्त्रिया वेल्डर म्हणून काम करण्यास येऊ लागल्या आहेत. रॅचेल क्रेनसारख्या अवजड यंत्रांवर काम करते. 'मी आता पुरुषी काम करते; त्यामुळे स्त्रीसुलभ कामांमध्ये मला रस वाटत नाही. मी वेल्डर आहे. मला मोटारसायकल चालवायला आवडते, मी पिस्तुलाने नेमबाजीचा सराव करते. कॅम्पिंग करायला, माझी धुळीने माखलेली बाइक वेगाने चालवायला आवडते. पुरुष करतात, तशा कितीतरी गोष्टी मी करते; पण मैत्रिणींबरोबर जेवायला जाताना मी खास स्त्रियांचे असणारे कपडे घालून जाते, तेव्हा खूप छान वाटते. असे वाटते, की मी कधीकधी किती छान दिसते,' रॅचेल सांगते. मोठमोठाल्या यंत्रांबरोबर काम करणाऱ्या या स्त्रियांनी असा प्रकारचे काम करण्यास उत्सुक असणाऱ्या स्त्रियांचे मनोधैर्य वाढवले आहे. शिवाय शारीरिक क्षमतेविषयी स्त्रियांच्या मनात असलेला गंडही काढून टाकला आहे. Sunita.Lohokare@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट