केदार आठवले चेहऱ्यावर मोहक हसू आणि गालावरची खळीही तितकीच खोल. स्वच्छ चादरीत गुरगुटून पहुडलेला सदू. खरं म्हणजे तो माझा लांबचा आजोबा, वय वर्ष ९४. अॅम्ब्युलन्सचा आवाज आला आणि सदूला आम्ही चौघांनी उचलून अॅम्ब्युलन्समध्ये ठेवले. त्याने, सदानंद कुलकर्णी हे शरीर मेडिकल कॉलेजला दान म्हणून लिहून ठेवलेले. सदूला कायमचा निरोप देताना मन अभिमानानं भरून आलं होतं. नकळत त्याच्या कपाळावर ओठ टेकले माझे. सदू... मी त्याला याच नावानं संबोधायचो. हट्टच होता त्याचा तसा. तो मला केदू म्हणायचा. मैत्रीला वयाचं बंधन नसतं हेच खरं. ४० वर्षं पोस्टात कधी नेहरूंच्या, तर कधी गांधींच्या टपाल तिकिटावर शिक्के मारत घालवली. त्यातही त्याचा परफेक्शनिस्ट. शिक्का तिकिटाच्या डाव्या खालच्या कोपऱ्यावर अर्ध गोलाकार आणि अर्धा तिकीटाबाहेर. हे झालेच पाहिजे. सदू रिटायर झाला तो पोस्टमास्तर म्हणून. त्याच्या या कार्याचे लहानशा निवे गावात खूप कौतुक झालं. स्थानिक वर्तमानपत्रात ही बातमी झळकल्यावर सदूनं मला फोन केलेला अजूनही लक्षात आहे. सदूचा मुलगा मध्यम गतीचा. कुठलासा कोर्स करून अमेरिकेत स्थायिक झाला होता. सदू एकदाही तिकडे फिरकला नाही. त्याला माणसांत राहायला जास्त आवडायचं. जवळच्या बागेत तो अनोळखी व्यक्तीबरोबर किती तरी गप्पा मारी. अट एकच ती व्यक्ती त्याच्या खाच्यात बसणारी हवी. संध्याकाळी तो आणि त्याचा एक सवंगडी जवळच्या 'अमृततुल्य'ला भेट देत. एकमेकांशी एक शब्दही न बोलता कटिंग चहा घशा खाली उतरवत आणि घरी येत. दहा वर्षांत एकही दिवस त्यानं चुकवला नव्हता. संध्याकाळचा श्वास आहे तो मित्राबरोबरच चहा. एकही शब्द न उच्चारता त्यांची मैत्री टिकून होती. सावित्रीबरोबर २५ वर्षं लग्नात राहिल्यावर सदू एकटा राहायला लागला. तो ओलावा काहीतरी कारणानं हरवल्यामुळे त्यांनी एकटं राहणं पसंत केलं. अधेमधे चहाला किंवा लंचला मात्र ते आवर्जून भेटत. सदू पक्का अवलिया होता. कधी मला तो रस्त्यावरच्या भिंती रंगवताना दिसे, कधी एखाद्या स्नॅक्स सेंटरवर हाउ कॅन आय हेल्प सू सर? म्हणत, कधी गजबजलेल्या चौकात पोलिसांना मदत करत, तर कधी हाफ चड्डीत सायकलवर पुणे ते गोवा सफरीवर निघत. माझी तो कस्सून चौकशी करायचा. अगदी व्यायामशाळेत किती वजन उचलतोसपासून नवीन कुठला लेख लिहिलास इथपर्यत. वर्षात एक तरी टार्गेट ठरवून गाठायचेच हे त्याचं वाक्य मी गाठ मारून घेतलं होतं. लोकांचे गोडवे गायला त्याला खूप आवाडे आणि तो ते करे अगदी मनापासून. त्याला मी रस्ता सफाई कामगारांना चॉकलेट देताना कित्येकदा पाहिलंय. नानाची 'पुरुष' नाटकातली भूमिका बघून प्रयोगानंतर वयानं लहान असलेल्या नाना पाटेकर यांच्या पाया पडताना मी स्वतः त्याला पाहिलंय. 'केदू काहीही झाले, तरी मला व्हेंटिलेटरवर ठेवायचे नाही,' असं त्यानं मला अनेकदा बजावलं होतं. एकही कृत्रिम वा त्याच्या मनाविरुद्ध श्वास घ्यायची त्याची इच्छा नव्हती. प्रत्येक क्षण आपण स्वतःसाठी आणि स्वतःला बेहेतर करण्यात घालवला पाहिजे असे तो म्हणे. आवडत नसताना केलेली एक क्रिया म्हणजे व्हेंटिलेटरच की. सदूला आयुष्यात एक क्षणॉही व्हेंटिलेटर लागला नाही हीच त्याची सगळ्यांत मोठी उपलब्धी! अशा सदूसोबत नातं जडलं होतं याचा अभिमान वाटतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट