टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला तकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. योग्य प्रमाणाबाहेर फेशियल केल्यामुळे त्वचेसंबंधी विविध समस्या उत्पन्न होऊ शकतात, कारण फेशियल करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा समावेश असलेले क्रीम वापरले जातात. या केमिकल्सच्या अतिवापरामुळे त्वचा खराब होते. १. फेशियलच्या वेळी चेहऱ्यावर स्क्रबिंग आणि मसाज केला जातो. चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यास त्वचेवर विपरित परिणाम होतात. चुकीच्या स्क्रबिंगमुळे त्वचेवर लाल डाग पडणे आणि इतर इन्फेक्शन होऊ शकतात. ओव्हर स्क्रबिंगमुळे त्वचेचा बाह्य थर खराब होतो आणि डाग वाढतात. २. पहिल्यांदा फेशियल करणार असाल, तर स्ट्राँग केमिकल्सचा समावेश असलेले क्रीम वापरू नका. अशा क्रीममुळे चेहरा लाल होऊन सूज येऊ शकते. काहीजणी डाग आणि पिम्पल्स नाहीसे करण्यासाठी फेशियल करतात; परंतु फेशियल केल्यानंतर डाग नाहीसे होतीलच याची खात्री नसते. काही वेळा त्याचा उलटा परिणामसुद्धा होऊ शकतो. ३. सातत्याने फेशियल केल्यास त्वचारंध्रे उघडी पडतात आणि त्यामुळे पिम्पल्स होण्यची शक्यता असते. फेशियलनंतर तेलकट त्वचेच्या महिलांना पिम्पल्स येणे सामान्य मानले जाते. ४. वारंवार फेशियलने त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. क्रीममधील केमिकल्सच्या संपर्कामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडली, की चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे फेशियल करताना अधिकाधिक नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या क्रीमची निवड करा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट