आयुष्यात अनेक स्त्रिया मला भेटत गेल्या. अनेकींच्या कामगिरीने, अस्तित्त्वाने मला प्रेरणा दिली. प्रत्येकीच्या व्यक्तिमत्त्वामधले मला काही ना काही नवीन सापडत गेले. अनेक महत्त्वाच्या घटनाही माझ्या आयुष्यात घडल्या, त्या निमित्ताने 'ती' समोर आली. त्यातलीच एक म्हणजे प्रा. डॉ. शशिकला कांबळे यांच्याशी झालेली भेट. सामान्य आयुष्य असूनही असामान्य कामगिरी असणाऱ्या शशिकलाबाईंचा प्रवास मुग्ध करणारा, प्रेरणा देणारा आहे. एस. पी. कॉलेजच्या मराठी साहित्य विभागप्रमुख म्हणून त्या नुकत्याच निवृत्त झाल्या. सहज गप्पा मारता मारता आयुष्याचा प्रवास त्यांनी माझ्यासमोर उलगडला.
तळागाळातील एक महिला कुणाचाही कसलाही आधार नसताना, मागे-पुढे कोणीही नसताना केवळ आपल्या शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे आयुष्य कसे घडवू शकते, हे मला त्यांच्या रूपाने अनुभवायला मिळाले. नेटाने, चिकाटीने आणि जिद्दीने या बाईंनी शिक्षण पूर्ण केले. मार्ग खडतर असतानाही पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि पी.एच. डी. पूर्ण केली. त्यानंतर त्या प्राध्यापिका मग विभागप्रमुख झाल्या.
त्यांच्या उत्कर्षाची कथा ऐकून मला वाटले, की गावागावांत, घराघरांत अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या जुनाट व्यवस्थेमध्ये घुसमटून गेल्या आहेत आणि त्यांना त्यातून बाहेर पडायचे आहे. अशा स्त्रियांना आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा असतो, काही तरी करायचे असते; पण भोवतीच्या पाशांमुळे, बंधनांमुळे त्यांना ते शक्य होत नाही; पण या बाईंचा संघर्ष ऐकून असे वाटले, की सामान्य जगण्यातूनही आपण उठून उभे राहू शकतो आणि अत्यंत स्वाभिमानी आयुष्य जगू शकतो.
त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी काय करू शकतो, असा विचार करताना त्यांच्यावर सिनेमा करण्याची कल्पना मनात आली. अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्याबद्दल जीवनपट होत असतात; पण अशा सामान्य व्यक्तींच्या असामान्य संघर्षाबद्दल फारसे काही बघायला मिळत नाही. अंजली पाटील यांची मुख्य भूमिका असणारा 'विद्यापीठ' नावाचा हा सिनेमा त्यांच्या शशिकलाबाईंच्या आयुष्यावर असून, त्याच्या कामाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांनी मला दिलेली प्रेरणा शब्दांमध्ये व्यक्त करायला गेलो, तर शब्दही अपुरे पडतील. घराघरांतील बायकांची कोंडी फोडणारी, आपल्या व्यवस्थेमध्ये दडलेल्या कठोर सत्यांचा उलगडा करणारी म्हणून मला भेटलेली 'ती' म्हणजे शशिकलाबाई प्रेरणादायी वाटतात. विद्या आणि पीठ अशा दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी काय काय करावे लागते, हे या बाईंनी मला शिकवले, म्हणून या चित्रपटाचे नाव 'विद्यापीठ' आहे.
माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम केलेले दुसरे पात्र म्हणजे 'बंदिनी' सिनेमामधील 'कल्याणी.' 'तामसी' या मूळ बंगाली कादंबरीवर आधारित बिमल रॉय यांनी हा हिंदी सिनेमा बनवला. खुनाचा आरोप असल्याने तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या 'कल्याणी' (नूतन) या स्त्री पात्राभोवती सिनेमाची कथा फिरते. नि:स्वार्थ, दुबळ्या आणि तरीही आतून तितक्याच खंबीर असणाऱ्या कल्याणीची ही गोष्ट. तिच्यामुळे माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. 'कल्याणी'चे पात्र सतत माझ्या आयुष्यात डोकावत राहते. अनेक स्त्रियांच्या रूपाने मला 'कल्याणी' पुन्हा पुन्हा भेटत राहिली. मी जेवढे सिनेमे दिग्दर्शित केले, त्या सगळ्यांमध्ये 'कल्याणी' आहे. या सिनेमांतील नायिकांचा उगम 'कल्याणी'च्या पात्रातून झालाय. माझ्या सिनेमांमधील नायिका मनाने सामर्थ्यवान आहेत. भक्कम पाठीचा कणा असलेल्या आणि त्याच वेळी पोटात भयंकर माया जपणाऱ्या, तीक्ष्ण बुद्धी असलेल्या तडफदार अशा ज्या नायिका मला माझ्या स्क्रिप्ट्समध्ये सापडल्या, माझ्याकडून घडत गेल्या त्या सर्वांचे मूळ 'बंदिनी' सिनेमातल्या 'कल्याणी'मध्ये आहे.
ही कल्याणी मला पावलोपावली भेटत राहिली आणि प्रत्येक वेळी आधीपेक्षा वेगळे काही तिच्याबद्दल समजत गेले. माझ्या घडत्या वयात मी तो सिनेमा पाहिला नसता, तर मी आज इथे असलो नसतो. तिने गायलेली गाणी, तिची अनेक दृश्ये माझ्या मनात घट्ट रुतून बसली आहेत. या सिनेमामुळे माझ्या आयुष्याचा पटच बदलून गेला. माझ्या जगण्यावर, स्वभावावर, भोवतालच्या गोष्टींवर या 'कल्याणी'चा इतका जबरदस्त परिणाम झाला, की वैयक्तिक आयुष्यात, माझ्या नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये ती परावर्तित होत राहिली. 'अब की बार ले चल पार' म्हणणारी कल्याणी मला भेटली नसती, तर माझी सिनेमा बनवण्याची पद्धत कदाचित वेगळी असली असती. मला त्या बाजूला जायचे आहे असे म्हणणारी ही स्त्री आपल्यामध्ये कायम पेरली गेलेली अस्वस्थता समोर आणते. अशा या स्त्रियांचे ठायी ठायी असणारे अस्तित्व नाकारता येत नाही.
असेच एकदा मी आणि माझी पत्नी वृंदा रेल्वेप्रवासासाठी स्टेशनवर गेलो, तेव्हा मी एक स्त्री पाहिली. तिच्या नवऱ्याला स्टेशनवरील जिना चढून जाणे शक्य नव्हते. तिने पटकन त्याला आपल्या पाठीवर घेतले आणि पटापट तो जिना चढूनही गेली. ते बघून एकदम मला 'कल्याणी'ची आठवण झाली. त्या आधी वाचलेल्या कथा असोत, पाठपुस्तकातले धडे असोत, भैरप्पांच्या कादंबऱ्या असोत किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग असोत, या 'कल्याणी'ची आणि माझी अशी भेट झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मला माझ्याही नकळत तिने दिली.
अशीच मला भेटलेली आणखी एक सामान्य स्त्री, जी मला अमूल्य धडा देऊन गेली. ती म्हणजे मुंबईची सुंदरा आजी. इतरांच्या घरी धुणे-भांडी करून जे कमावले आहे, ते सर्व ती आपल्या जवळच्या लोकांमध्ये वाटून टाकायची. सावत्र मुलाच्या शिक्षणासाठी तिने घेतलेली अपार मेहनत आश्चर्यचकित करणारी आहे. तिचे निरिच्छ असणे, तिचे समर्पण हेच मला खूप काही शिकवून गेले. कसलाही मोह न ठेवता न थांबता काम करत राहणे, हे मी तिच्याकडून अनुसरले आहे. आपण सतत काम करत राहिलो, की ते कामच आपल्याला आदर मिळवून देते, असे मूल्यवान धडे तिच्या चेहऱ्यांवर आलेल्या सुरकुत्यांनी मला शिकवले. तिच्या प्रत्येक सुरकुतीमध्ये सामावलेले जगणे मी हळूहळू अनुभवले. तिचा दानशूर स्वभाव, माया, स्वभावातील गोडवा वाखाणण्याजोगा होता.
काही वेळा सामान्य घटनांमधून भेटलेल्या अनेकींनी आयुष्यभर पुरेल असा खजिना दिला. माझ्या आयुष्याच्या पटाचा एकेक पदर उलगडण्यात आणि त्याची जाणीव करून देण्यात मला भेटलेल्या या स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे.
(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.)
संकलन - अनुजा मुळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट