'काय? मग आता पुढे काय करणार?' या प्रश्नाने कंटाळलेली सोनल आपल्या खोलीत दार लावून शांत बसली होती. शिक्षणाच्या असंख्य वाटांपैकी एक निवडणं तिच्यासाठी आता खूप कठीण होत होतं. लहानपणापासून आकाशात उडणाऱ्या विमानाचे तिला असणारे प्रचंड आकर्षण आणि गेली तीन वर्षे कथक शिकून त्यात मिळवलेले प्रावीण्य या दोन्हीपैकी एक निवडणं तिच्यासाठी फार अवघड होऊन बसलं होतं.
शिक्षण सुलभतेने हाताळता यावी म्हणून विविध विषयांचे तीन मुख्य शाखांमध्ये विभाजन करण्यात आले ते म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान. ज्याची जी आवड त्याने ती शाखा निवडावी असा अलिखित नियम झाला. त्यातही विज्ञानाकडे वळणाऱ्या मुलींची संख्या सुरुवातीच्या काळात फारच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजावं अशीच होती. नंतर मात्र हळूहळू हे प्रमाण वाढले. विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा तर खूप अभ्यास करावा लागेल, या विचारामुळे अंगभूत कलागुणांना बाजूला सारून, अनेक मुली केवळ अभ्यास एके अभ्यास करू लागल्या. त्यामुळे विज्ञान शाखा आणि तंत्राधारित शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलींना आपल्या कलांना तिलांजलीही द्यावी लागली. याउलट कला क्षेत्र निवडणाऱ्या मुली विरंगुळ्यात जीवन व्यतीत करतात, असादेखील समज झाला. या सगळ्यात मधल्या मध्ये अडकल्या त्या एकापेक्षा अधिक आणि परस्पर भिन्न क्षेत्रांची आवड असणाऱ्या मुली. कलेला मरण नाही, मात्र त्यातून अर्थार्जन करणे कठीण असल्यामुळे कालांतराने मुलीदेखील तंत्रज्ञानाकडे वळल्या. करिअरच्या अनेक नवनवीन वाटा त्यांनी चोखळल्या. डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट, पायलट, पॅथॉलॉजिस्ट, या आणि अशा अनेक अभ्यासक्रम निवडून त्यात प्रावीण्य मिळवू लागल्या. पण, या क्षेत्रात काम करताना अनेकदा जाणवणारा यंत्रवतपणा कित्येक मुलींना काहीतरी नवीन पर्यायांची शोध घेण्यासाठी प्रवृत्त करीत होते. त्याचमुळे वेळेचे नियोजन करीत अभ्यास आणि काम सांभाळत आपली आवड जोपासणाऱ्या अनेक महिला आज आजूबाजूला दिसतात. कामातून येणारा ताण मॅनेज करण्यासाठी आज अनेकींनी कलेला जवळ केलेले जाणवते. मग ती कला रांगोळी काढण्याची असो, विणकामाची असो किंवा अगदी नृत्य, गायनाची. आपल्यापुरता आपल्यासाठी असलेला हा एक कप्पा आज अनेक मुली, महिलांना खुबीने जतन केलेला पाहाला मिळतोय.
चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लेखन, अभिनय यासह दिग्दर्शन, फॅशन, डबिंग, शिल्पकला यासारख्या क्षेत्रांकडे महिला आज निव्वळ एक छंद म्हणून वळत आहेत. तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या विविध उपक्रमातून अशा मुलींना एक उत्तम मंच मिळाला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून, अभ्यासव्यतिरिक्त इतर कलागुणांना वाव मिळाल्यामुळे विद्यार्थीदशेत या अभ्यासाचा येणारा ताण आपोआप कमी होत आहे. याचसोबत कॉलेजनंतर कामाच्या ठिकाणी येणारा ताण कमी करण्यासाठी अनेकजणी आपल्यातील कलेला वाव देतात. अनेकजणी नव्याने काहीतरी कला शिकून तिच्यामध्ये रमण्याचाही प्रयत्न करताना दिसून येतात. 'व्वा..मुलगी डॉक्टर असून काय उत्तम अभिनय करते!', हे उद्गार ऐकल्यानंतर जो आनंद होतो तो समाधान देणारा असतो, असे याबाबत बोलताना डॉ. नेहा पालवे सांगते. मी इंजिनीअरिंगला असतानाही गाणं शिकत होते. त्यासाठी वेळ देताना ओढाताण होत होती. पणं जेव्हा नोकरी सुरू झाली, तेव्हा मेंदूवर येणारा ताण कमी करण्याचं काम हे गाणंच करू लागलं, अशी भावना श्रद्धा पाठकने व्यक्त केली. दोन परस्पर भिन्न क्षेत्रात रमणे हे 'स्विच ऑफ' आणि 'स्विच ऑन' या तंत्राप्रमाणे असल्याचं सीमा कडवे सांगते. हे तंत्र आयुष्याला खूप बॅलन्स करीत असल्याचा तिचा अनुभव आहे. शिक्षण आणि अर्थार्जनामागे धावताना उपजत कला किंवा नव्याने एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा दडपून न टाकता तिलाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं असल्याचं ती सांगते. शिक्षणाने स्वावलंबी होणाऱ्या मुली, त्या शिक्षणाला कलेची झालर लावून, स्वच्छंदीदेखील झाल्याचे आज पाहायले मिळतंय. प्रोफेशन आणि पॅशन यांची उत्तम सांगड घालत आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा दाखवणाऱ्या मुलींची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. दोन्ही उत्तम करणं सोपं नसलं तरी ते त्यांना समाधान देणारं नक्कीच आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. कलेतून मिळणारा आनंद, समाधान हे त्यातून अपेक्षित अर्थार्जनच्या चौकटीत बांधता न येणारं आहे. कलेचे व्यवसायात रूपांतर न होऊ देता तिचा मनमुराद आनंद लुटणे, अविरत, कलेच्या ओघात स्वतःला झोकून देऊन, स्वतःला रोज नव्याने शोधणं हे या मार्गाने शक्य आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट