Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कसा वाढवणार 'इक्यू?'

$
0
0

स्वाती टोकेकर

मुलांचा 'इमोशनल इंटेलिजन्स' कधी कधी जाणीवपूर्वक वाढवायचा असतो; कारण काही मुलांना हे उपजत असते. प्रमाण कमी अधिक असते; पण काहींमध्ये ते अगदीच अल्प असते. काही मुले जोरजोरात रडतात, हातपाय आपटतात, वस्तू फेकतात, तोडतात तर कधी खूप ओरडतात, उत्साहित होतात, घाई करतात, घाबरतात, जोरजोराने हसतात. आपल्याला काय वाटतेय हे सांगण्याचा तो प्रयत्न असतो. काही वेळेस आई-वडील किंवा नात्यातील आजारी व्यक्तींशी कसे वागावे ते त्यांना जमत नाही. खूपदा असे आढळते, की मुले सुख-दुःखाच्या प्रसंगी आपल्या भावना समर्थपणे व्यक्त करू शकत नाहीत. अगदी मोठे झाल्यावरही माणसांना आपल्या भावना 'कम्युनिकेट' करता येत नाहीत, म्हणूनच हा विचार करायला हवा, की आई-बाबा म्हणून मुलांच्या 'अॅकेडॅमिक इंटेलिजन्स'बद्दल आपण जेवढे जागरुक असतो, तितके त्यांच्या 'इमोशनल इंटेलिजन्स' अर्थात भावनिक बुद्धिमत्तेबाबत सजग आहोत का?

'इमोशनल इंटेलिजन्स' हा तुमच्या मुलाचे माणूस असण्याचे, जिवंतपणाचे लक्षण आहे. मुलांना आपल्या भावना ओळखता येणे, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता येणे, त्यांचे नियोजन करता येणे यावरून त्यांचा 'इमोशनल कोशंट' कळतो. हे करता येणे आणि हे करताना इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांचा आदर करता येणे हेही मुलांना शिकवायला हवे. मुलांना याचे खूप फायदे होतात. उच्च 'इमोशनल कोशंट' हा 'इंटेलिजन्स कोशंट'शी जोडलेला असतो. अशी मुले 'स्टँडर्डाइज्ड टेस्ट'मध्ये छान यश मिळवतात. 'इमोशनल इंटेलिजन्स' कौशल्यामुळे मुलांना संघर्षांचा सामना करता येतो. गाढ मैत्री विकसित करता येते. मोठेपणी अशी मुले वैयक्तिक आणि व्यावसायिक नाती उत्तम पद्धतीने सांभाळू शकतात. लहानपणी 'इक्यू' चांगला तयार झाला असेल, तर मोठे होताना यशस्वी होण्याच्या वाटा प्रशस्त होतात. जी मुले शेअर करणे, सहकार्य करणे, सांगितल्याप्रमाणे सूचनांचा अवलंब करणे ही कौशल्ये लहान वयात प्राप्त करतात. ती नक्कीच मोठेपणी यशस्वी ठरतात. तसेच, ही मुले भविष्यात निराशा आणि मानसिक अनारोग्याला बळी पडत नाहीत.

मुलांचा 'इमोशनल इंटेलिजन्स' वाढवणे म्हणजे तरी नेमके काय? तर कठीण परिस्थितीत तुमच्या मुलांना राग आला असला, तरी स्वतःला शांत ठेवता येणे. आपला राग, सुख-दुःख, आवडनिवड, अस्वस्थ असणे, मतभेद हे सगळे अतिशय निरोगी पद्धतीने व्यक्त करता येणे, ज्यातून निरोगी नातेसंबंध सांभाळणं मुलांना जमते. मुलांमध्ये 'इमोशनल इंटेलिजन्स' शिकण्याचे कौशल्य असतेच. फक्त ते कसे विकसित करता येईल, हे आपण मोठ्या माणसांनी मुलांना शिकवायला हवे. ते कसे शिकवायचे हे आपण पाहू. मुलांच्या भावना त्यांना ओळखायला शिकवा. मला नेमके काय वाटतेय, त्याला नाव द्यायला मदत करा. तुझे खेळणे हरवलेय म्हणून तुला राग आलाय का? आज आपण आजी-आजोबांना भेटायला जाऊ शकलो नाही म्हणून तुला वाईट वाटतेय का? प्रसंगानुसार त्याला कसे वाटतेय? का? असे बोलत राहा.

आपल्याला कळते, की ज्या वेळी मुले नाटक करत आहेत तेव्हा थोडी कमी सहसंवेदना (एम्पथी) दाखवा. त्यांच्या भावना ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त करत आहेत, हे त्यांना समजेल.

त्यांना आपल्या भावना समजून घ्यायला म्हणजेच खूप राग, थोडे वाईट वाटणे, सारखी भीती, प्रचंड आनंद, असे समजून घेणे शिकवा.

खरेच तसे, तितके वाटायला हवे का हा विचार द्या. हो, मलाही असेच वाईट वाटते, मनाविरुद्ध होते; पण करावे लागते, हेही समजून सांगा.

समाजात वावरताना आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या असतात ते कळायला हवे. मला तेव्हा राग येतो, मला तेव्हा खूप आनंद होतो असे तुम्ही म्हणा. म्हणजे वस्तू फेकणे, किंचाळणे याऐवजी भावना कशा व्यक्त करायच्या याचा वस्तुपाठ घरातूनच मिळतो.

एकदा का भावना ओळखता यायला लागल्या, की त्याचे व्यवस्थापन शिकवता येते. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे, स्वतःला शांत करणे, चीअरअप करणे, भीतीवर कंट्रोल करणे हे मुले शिकतात.

आपल्या भावनांचे नियमन करण्यासाठी काही गोष्टी करता येतील. जसे, की कलरिंग बुक, जोक्स बुक, संगीत ज्यामुळे मुले शांत होतील. अशा वस्तूंचा बॉक्स त्यांना नक्कीच मदत करेल.

'इक्यू'मध्ये समस्या निराकरणाचे कौशल्य असते. समस्या ओळखा, किमान पाच उपाय शोधा. उत्तम पर्याय निवडा. पालकांनी फक्त प्रशिक्षकाचे काम करावे. मुले शांतपणे, प्रभावीपणे समस्या सोडवू शकतात आणि चुकली, तर दुसरा पर्याय कसा वेगळा आहे हे पटवता येते. मुलांशी भावनांबद्दल बोलत राहा; कारण बालपण ते पौगंडावस्थेत त्या बदलत असतात. आयुष्यातील वास्तव स्थितीबद्दल बोला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>