प्रसंग एक : सुगरण असलेल्या माधवीला कुटुंबकबिल्यात चांगलाच भाव आहे. मैत्रिणींची भिशी पार्टी असो वा नवऱ्याच्या मित्रांची बैठक माधवीच्या हातच्या पदार्थांनीच सजते. मुले तर इतकी नाठाळ आहेत की, माधवी सोडून कुणाच्या हातचा पदार्थ चाखतही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माधवीने सण समारंभातील अप्रतिम मेजवानीची बाजू एकहाती लावून धरली आहे. याचा तिला अभिमान, गर्व काय अजून असेल ते सगळं आहे. नव्हे! होतं. होय. भूतकाळात तिला आनंद व्हायचा तिने बनवलेल्या पदार्थांची कुणी तारीफ केली तरी आता मात्र त्या कौतुकाची तिला शिसारी यायला लागली आहे.
कुणी काही पदार्थ करून मागितला तर तिच्या जीवावर यायला लागलं आहे. स्वयंपाकघरातील घोरपड असं तिचं मुलांनी केलेलं नामाभिदान आता माधवीला झटकून द्यावंस वाटतंय. कंटाळा आलाय तिला या एकसुरी जगण्याचा. स्वयंपाकघराखेरीज हिला काही समजत नसेल, हे सासूपासून मैत्रिणींपर्यंत अन नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळ्यांनाच वाटतं. माधवीला यातून बाहेर पडायचं आहे. इथून पुढे काही दिवस, महिने तिला पायही टाकायचा नाहीये स्वयंपाकघरात. पण हा निर्णय घरच्यांना सांगायची धास्ती वाटतेय तिला.
प्रसंग दोन : रीना एक दबंग गर्ल. म्हणजे ती तशी आहे चाळीशीची, पण सगळे तिला दबंग गर्ल म्हणूनच ओळखतात. एकदम बेबाक, निडर, बिनधास्त. उलट लोक तिला घाबरून असतात. ही बया कधी, कुठे, केव्हा कसं आपल्याला खिंडीत पकडेल याचा नेम नाही त्यामुळे बायका काय किंवा पुरुष काय तिच्यापासून फटकून रहातात. कुटुंब तर तिचा नाद करतच नाही. खरं म्हणजे रीनाला स्वत:ला आपली ही प्रतिमा आवडतेय. जे इतरांना जमत नाही ते ती लीलया करून मोकळी होते, याचा तिला अभिमान आहे. कायम तोंड शिवलेल्या समाजाची लोकोपयोगी कामे रीनामुळे होतात, तेव्हा गर्व वाटतो तिला स्वत:च्या निडरतेचा. पण, तत्वासाठी लढणारी रीना हळूहळू एकटी पडत चालली आहे. कायम सत्य बोलण्याच्या तिच्या ध्यासाने तिला फटकळ उपाधी मिळाली आहे. उद्धट असल्याचं बिरूद लागलं आहे. अनेक शत्रू यामुळे तिने निर्माण करून घेतले आहेत. कामाच्या वेळी तिला बोलवून घेणारे लोक काम संपल्यावर तिचा सहवास टाळतात, रीनाला हे सगळं समजायला लागलं आहे. रीनालादेखील आता माणसांची गरज वाटू लागली आहे. मित्र-मैत्रिणींच्या साध्या, सोप्या अन् हसत्या-खिदळत्या गप्पा तिला हव्याशा वाटू लागल्या आहेत. लोकांनी तिला केवळ अडचणीच्या वेळीच नाही, तर इतर प्रसंगीही आठवावं अशी तिची इच्छा आहे. रीनाला स्वत:मध्ये मोल्ड करायचा आहे. पण ते तिला जमत नाहिये.
प्रसंग तीन : 'आमची अर्चिता म्हणजे सामाजिक प्राणी आहे', असं कौतुकाने अर्चिताचे बाबा आल्या-गेल्यांना सांगत असतात. अर्चिताचं मित्रमंडळ अफाट आहे. शंभर ठिकाणी. क्लास आहेत, कॉलेज आहे, कॉलनी आहे, नाटक सिनेमाची आवड आहे. तिथे हातपाय मारत असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा मित्रांचा वेगळा ग्रुप आणि अर्चिता कायम त्या गराड्याच्या केंद्रस्थानी. अर्चिता बोलकी आहे, हळवी आहे, इतरांना कायम समजून घेणारी आहे, त्यांचे प्रश्न सोडवणारी आहे त्यामुळे ती कुठेही असली तरी चेरी ऑन द केक असते. याचा अर्चितालाच नाहीतर तिच्या घरच्यांनाही अर्थातच अभिमान आहे. सगळे तिच्यापाशी येऊन मन मोकळे बोलतात, समस्या असतील तर सोडवून घेतात, अर्चिता सगळ्यांना जवळची वाटते. पण अर्चिताच्या जवळ कुणी आहे का? हाच प्रश्न अलीकडे तिला सारखा-सारखा पडतोय आणि तिला लोकांमध्ये मिसळायचा कंटाळा येतोय. अर्चितालादेखील तिची काही खास गुपित कुणासोबत शेअर करावीशी वाटतात. पण त्यासाठी लायक कुणी वाटत नाही. अर्चिताला अशी एक तरी मैत्रीण अथवा मित्र असावा असं वाटतंय. पण तिला कुणी सापडत नाहीये.
ही काही आपल्या आजूबाजूच्या महिलांची उदाहरणं. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक महिला आपल्याला दिसतील, ज्यांनी आपलं आयुष्य मेन्टली लॉक म्हणजे मानसिकरित्या कुलूपबंद करून घेतलं आहे. गेल्या वर्षभरापासून आपण लॉक-अनलॉकचा खेळ पाहतोय. कधी याचा आपण स्वत:वर प्रयोग केला आहे का? करोना काळाने काही नवीन शब्द अन् अर्थच्छटा आपल्याला दिल्या आहेत. त्यात 'अनलॉक' शब्दाशी आपली चांगलीच ओळख झाली आहे. इथून पुढे कितीवेळा लॉकडाऊन होईल आणि कितीवेळा जनजीवन अनलॉक होईल माहिती नाही. त्याची सवय देखील होईल, किंबहुना ती आता झालीच आहे आपल्याला. कुलूपबंद जगणं वाईटच हे आपल्याला समजलं आहे. पण, आपल्याला हे समजलं नाहीये की, आपल्यातील निम्याहून अधिक लोक कायम मानसिक कुलूपबंद आयुष्यच जगत असतात. ही कुलूपं अनेक स्तरावर लागलेली असतात, त्याची चावी आसपासच असते. गरज असते आपल्या इच्छाशक्तीचा जोर लावण्याची.
आता पहिल्या प्रसंगातील माधवी! तिला स्वत:वरील सुगरणपणाचा शिक्का आता पुसून टाकावासा वाटतोय. अनेक वर्षे एकच एक काम करून तिचं मन उबून गेलं आहे. खरं म्हणजे तिने काही दिवस स्वयंपाक न करण्याचा निर्णय घेतलाय खरा, पण कुटुंबाला सांगून ती तो कितपत अंमलात आणू शकेल याबद्दल तिला खात्री नाहीये, की कायम इतरांकडून होणाऱ्या आपल्या पाककलेच्या कौतुकाची सवय माधवीला झाली आहे? चटक लागली आहे. पाककलेच्या जोरावर इतरांवर राज्य करण्याची? नक्कीच, त्यासाठी ती मेहनत करते, आपला जास्तीत जास्त वेळ देते. तरीही आपण हे काम थांबवलं तर आपलं महत्त्व कमी होण्याची पुसटशी का होईना पण भीती असेल का माधवीच्या मनात?
माधवीचे विचार आणि आपल्या दुसऱ्या प्रसंगातील दबंग गर्ल रीनाचे विचार जुळतात बघा. माधवीला निर्णयाच्या अंमलबजावणीत त्रास होईल वाटतंय, तर रीनाला स्वत:ला मोल्ड करता येत नाहिये. प्रश्न वेगळे असले तरी मूळ एकच आहे. रीनाला मोल्ड करायचं आहे स्वत:ला म्हणजे स्वभाव बदलायचा आहे, आक्रमकता कमी करायची आहे, तत्त्वांसाठी लढतांना माणस तुटू द्यायची नाहीत. स्वभावाला मुरड घालता येते. पण तोच मुद्दा माधवीच्या प्रसंगातला इथे येतो. कायम स्वत:बद्दल कौतुक ऐकायची सवय झालेल्या रीनाला वेगळेपणाचा भास मिळाला नाहीतर अस्वस्थ व्हायला होईल, हे ती जाणून असल्याने तिला मोल्ड होता येत नाहिये.
अर्चितादेखील स्वत:ला ओळखून आहे. समूहापेक्षा आपण निराळ्या आहोत याचा तिला गर्व आहे. कुटुंबाचे वर्तनदेखील तिच्या अशा विचारांचे पोषण होईल असे असल्याने, तिला आपल्या लायकीचे मित्र कुणी वाटत नाहीयेत. पण मोकळे होण्याची गरज तिलादेखील आहे. तिने स्वप्रेम बाजूला ठेवले, वेगळेपणाची झूल उतरवून ठेवली तर तिच्यासारखी आनंदी तीच असेल. कायम चेरी ऑन द केक कुणीच राहू शकत नाही, हे मान्य केलं की अर्चिता अनलॉक होईल. रीनाने स्वप्रतिमेच्या प्रेमातून बाहेर यायची तयारी दाखवली की ती मोल्ड होईल, लॉक निघालेलं असेल. माधवीला ठरवावं लागेल कौतुकासाठी पाककला की अधून मधून पाककलेच कौतुक! लॉक-अनलॉक होत जातील आणि जगण्यात सहजता येत जाईल. अनलॉक होण गरजेचे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट