Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

जावई माझा भला!

$
0
0

चित्रा राजगुरू

'लग्नानंतर माझ्या आई-वडिलांचा स्वतःचे आई-वडील समजून सांभाळ करणारी, घरात एकरूप होऊन सगळ्याच्या आवडी-निवडी जपणारी, घरातल्या लहान थोरांना आपलसं करून घेणारी ती असली पाहिजे.' लग्नासाठी मुलगी कशी हवी या प्रश्नाचं असं सहज आणि ठरवून ठेवलेलं उत्तर अनेकजण देतात. पण अशाच अपेक्षा मुलीने मुलाकडून ठेवल्या तर? मग मात्र सगळं गणितचं बदलेल. 'फारच मोठ्या अपेक्षा आहेत हिच्या, लग्नाआधी इतकं बोलतेय मग लग्न झाल्यावर तर विचारायलाच नको. आई-वडिलांची फारच काळजी दिसतेय हिला, लग्न झाल्यावर निघेलच उठसूट माहेरी', यासारख्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.

लग्न-गाठ बांधताना एकमेकांच्या सुख-दुःखात, यश-अपयशात एकमेकांच्या नाते संबंधांत वाटेकरी होण्याचं वचन दिलं-घेतलं जातं. पण, हे वचन बहुतांश वेळा केवळ एकेरी बाजूनं पूर्ण केलं जातं. घर-दार, आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी हे सगळं मागे सोडून आलेली मुलगी एका नवीन घराला अपरिचित लोकांमध्ये राहून आपलसं करून घेते. त्या घराशी जन्मा-जन्माच्या तिच्या गाठी बांधल्या जातात आणि ती प्रत्येक नवीन नात्याला स्वतःशी घट्ट जोडून घेते. सासूला 'आई' आणि सासऱ्यांना 'बाबा' म्हणून तोंड भरून हाक मारते. पण, खऱ्याखुऱ्या आईला भेटण्याची इच्छा झाली तर मात्र या 'आई-बाबां'ची रीतसर परवानगी घ्यावी लागते. या उलट जावई मात्र सासुरवाडीला पाहुण्यासारखे वावरतात. आपल्या आईला स्वतःची आई म्हणून सांभाळणाऱ्या बायकोच्या आईची साधी 'तब्बेत कशीये?' इतकी साधी चौकशीसुद्धा करणं जमत नाही अनेकांना. सून मुलगी होऊन परक्या घरात राहू शकते, पण जावई, मुलगा म्हणून सासू-सासऱ्यांची काळजी घेऊ शकत नाही हा अलिखित नियमच आहे आपल्याकडे. हल्ली अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अनेक घरात मुलगी एकटी असते. लग्न होऊन ती सासरी जाते. पण, आई-वडिलांच्या अनेक गोष्टींत तिला लक्ष घालावं लागतं. ती जबाबदारी पार पाडतेच, परंतु दोन घरातल्या आई-वडिलांना सांभाळून घेताना जर नवऱ्याची साथ मिळाली, तर तिच्या मनावरचे कितीतरी ओझे हलके होईल याचा विचारही केला जात नाही. लग्न या संबंधातून जोडलेल्या नात्यातून दोन कुटुंबे एकत्र येतात. अशा वेळी मुलीचे असो वा मुलाचे, दोघांच्या आई-वडिलांना समान वागणूक आणि आदर दिला गेला पाहिजे.

आपल्याकडे जावयाला देवाचा दर्जा दिला जातो. सणा-समारंभाला, लग्न कार्यात जावयाला विशेष मान दिला जातो. पण ज्यांच्याकडून आपल्याला अशी विशेष आदराची वागणूक मिळते त्या आपल्या आई-वडिलांसमान लोकांशी असलेलं जवळचं नातं जावयानं विसरता कामा नये. खरं तर जावयाला दिल्या जाणाऱ्या या मानपानात एक फार मोठी जबाबदारी दडलेली असते. त्या घरातील आई-वडिलांना आपलंसं करून घेण्याची, त्यांच्या मनातला आपल्याविषयी परकेपणा दूर करण्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी ओळखून ती पार पाडता आली पाहिजे. अलीकडच्या काळात काही घरांत हा बदल दिसून येतोही. पण त्याचं प्रमाण फारच कमी आहे. मुलीचं माहेर आणि सासर एकाच शहरात असेल तर अनेकदा मुलीहून जास्तवेळा जावई सासू-सासऱ्यांची चौकशी करीत असतात. काही ठिकाणी तर सासरे आणि जावई अगदी दोस्त बनून राहतात आणि सासूबाई आवर्जून जावयाचे खाण्या-पिण्याचे लाड पुरवतात. पण, अशा सुखी घराकडे अनेकांची तिरकी नजर असते. दोन कुटुंबांच्या या सहज आणि सुरेख संबंधांना स्वार्थाची झालर असेल, अशा शंका उगाचच लोक उपस्थित करतात. 'सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर डोळा असेल, म्हणूनच तर सारखा येत-जात असतो जावई घरी', असे बोलही लावले जातात. म्हणजे सून, सासू-सासऱ्यांच्या डॉक्टरच्या वेळा सांभाळत असेल, त्यांचे जेवण, औषध, बाहेर येणे-जाणे, त्यांच्या नातेवाइकांसाठी ऑफिसमधून सुटी घेऊन वेळ काढणं या सगळ्या गोष्टी करीत असेल तर तिला 'आदर्श सून' म्हणायचं. पण यातील निम्म्या जरी गोष्टी जावयाने आपल्या सासू-सासऱ्यांसाठी केल्या, तर मात्र त्याला 'लोभी' म्हणायचं. हा विचार किती मागासलेला आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही.

आजच्या काळात ऑफिसच्या वेळात मुलांना सांभाळणे, त्याच्यावर योग्य संस्कार करणे या सगळ्या गोष्टींना पुरेसा वेळ देता येत नाही. अशावेळी अनेकदा मुलीचे आई-वडील 'आम्ही आहोत', असे म्हणून पटकन नातवंडांची जबाबदारी घेतात. मुलाच्या काळजीचा प्रश्न चटकन सुटतो. अशावेळी त्या मुलीच्या आई-वडिलांची काळजी घेणं, त्या मुलीप्रमाणेच जावयाचंही कर्तव्य आहे. घरातली इतकी मोठी जबाबदारी वाटून घेण्याची तयारी जर सासू-सासरे दाखवतात, तर जावयानेदेखील त्यांना आपल्या घरातले समजून त्यांची जबाबदारी वाटून घ्यायला हवी. पुढील पिढीसाठी ही शिकवण फार महत्त्वाची आहे. आधुनिकतेचा प्रचंड भडीमार सध्या आपल्यावर आणि आपल्या मुलांवर होत आहे. हा आलेख पुढच्या काळात असाच उंच उंच होत जाणार आहे. अशावेळी प्रत्येक नात्याचं महत्त्व मुलांना आताच समजावून सांगणं फारच गरजेचं आहे. कौटुंबिक नाती जपणे पुढील पिढीसाठी फार कठीण जाणार आहे. अशात 'सासू- सासरे आणि जावई' या नाजूक नात्याची अनेक सकारात्मक उदाहरणे पुढील पिढीसाठी तयार करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>