आकांक्षा मारुलकर
व्हॅलेंटाइन डे म्हणजे नवं प्रेम...सळसळता उत्साह...दुकानात गिफ्ट्स घेण्यासाठी गर्दी करणारी कॉलेजची मुलं किंवा महागड्या हॉटेलात डिनर असा तुमचा समज असेल तर तो काढून टाका. प्रेमाचा हा दिवस अमुक एका पद्धतीनेच साजरा करायला हवा असा कोणताही नियम इथे लागू होत नाही. लग्न झालेल्यांनी, हा दिवस फक्त तरुणांचा म्हणून खट्टू व्हायचं कारण नाही. प्रेमात पडायला किंवा प्रेम साजरं करायला वयाचं कुठलंही बंधन नसतं. त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांनीही या सेलिब्रेशनमध्ये मागे राहायला नको.
लग्न झालेलं असलं तरी तुमचा व्हॅलेंटाइन कसा खास बनवता येईल त्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. खिशाला परवडतील अशा सध्या, सोप्या पण आकर्षक आयडीयाज यात आहेत. अनेकांना त्या दिवशीही ऑफिसला जायचं असतं. त्यामुळे थोड्या वेळात करता येणारं सेलिब्रेशन आम्ही तुम्हाला सुचवतोय.
> रोजच्या धावपळीत एकमेकांशी निवांत बोलायला चार क्षणही मिळत नसतील, त्यात 'आय लव यु' म्हणणं तर लांबच राहिलं. लग्नापूर्वी फोनवर किंवा मेसेजवर दिवसातून दहा वेळा बोललेलं हे वाक्य पुन्हा एकदा बोला की. नुसतं बोलून नाही तर तुमचं प्रेम अगदी सहज-सोप्या शब्दांत पटवून द्या. बोलणं कठीण जात असेल तर एका चिठ्ठीवर लिहून रात्री ती जोडीदाराच्या उशीजवळ ठेऊन द्या. सकाळी उठल्यावर एक गोड सरप्राइज मिळाल्यामुळे दिवसाची सुरूवात छान होईल.
> हा दिवस अविस्मरणीय बनवायचा असेल तर थोडीशी तयारी करा. एक छोटंसं पुस्तक किंवा डायरी लिहायला घ्या. जोडीदारावर तुम्ही किती प्रेम करता आणि त्याचं किंवा तिचं तुमच्या आयुष्यातलं योगदान याबद्दल तुमच्या मनातले विचार लिहा. यात आपण किती चांगलं लिहितो यापेक्षा, किती मनापासून आणि खरं लिहितो याकडे लक्ष द्या. मुखपृष्ठ म्हणून तुमच्या दोघांचा छानसा फोटो चिकटवा.
> गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतिक! शिवाय बायकांना गुलाब दिलेले फार आवडतात. नुसतीच फुलं किंवा बुके देण्यापेक्षा थोडेसे क्रिएटिव्ह व्हा. लाल रंगाचे १२ गुलाब घेऊन प्रत्येक गुलाबाबरोबर एक छोटीशी नोट लिहा. पुढच्या १२ महिन्यांसाठीचे प्लान तुम्ही यातून व्यक्त करू शकता. उदाहरणार्थ : मार्च ; २ दिवसांची लहानशी ट्रिप, एप्रिल ; आवडत्या हॉटेलात जेवण. अशा प्रकारे वर्षभराचं सरप्राइज एकदम मिळाल्यावर कोण खुश होणार नाही ?
> लग्नापूर्वीचे तुम्ही दोघं जरा आठवून बघा. पहिली डेट किंवा पहिली भेट कुठे झाली त्या हॉटेलमध्ये जाउन त्या भेटीबद्दल बोलायची संधी या दिवशी गमावू नका. गंमत म्हणून पुन्हा एकदा काही वेळापुरतं अनोळखी व्हा आणि नव्याने सुरुवात करून बघा.
> दोघांना जेवण बनवण्याची आवड असेल तर एकत्र स्वयंपाक करणं यासारखं रोमँटिक दुसरं काही नाही. फक्त महागड्या हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा आवडत्या व्यक्तीबरोबर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. त्यामुळे शांत संगीत, मंद लाइट्स अशा खास हॉटेलच्या ढंगात तुम्ही एकत्र स्वयंपाक करू शकता. डायनिंग रूम थोडीशी सजवून, मेणबत्ती लाऊन कँडल लाइट फूडचा आस्वाद घरीच घेता येईल.
> दोघांचा आवडता एखादा जुना सिनेमा घरीच बसून, कॉफी पित बघता येईल.
> शॉपिंगची आवड असेल तर आधीच शॉपिंग करून दोघांनाही एकाच रंगाचे किंवा साधारण मचिंग असे कपडे घ्या.
> चॉकलेट खायला वयाचं बंधन नाही. सगळ्यांनाच ती आवडत असल्यामुळे आपल्या जोडीदाराला चॉकलेट्सचं सरप्राइज द्या. घरी बनवता येत असतील तर आणखी मजा. ती लाल रंगाच्या कागदात बांधून आकर्षक दिसतील अशा पद्धतीने त्याच्या किंवा तिच्या वस्तूंजवळ ठेवता येतील.
> तुमचं लिखाण चांगलं असेल तर एखादी कविता करायला हरकत नाही. ती कविता वाचून दाखवा किंवा फ्रेम करून भेट द्या.
> रोज नवऱ्याला डबा देत असाल तर या दिवशी नकार द्या. सरप्राइज म्हणून लंच ब्रेकमध्ये त्याच्या ऑफिसात जाऊन पोहोचा आणि लंचला बाहेर घेऊन जा.
↧
प्रेमात रंगू पुन्हा
↧