मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव बेटी पढावो, दोन घरांना जोडते ती मुलगी तिला वाचवा, तिला जगू द्या...यासारख्या विविध घोषणाद्वारे शासन मुलींबाबात सकारात्मक वातावरण निर्माण करते. पण मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला की या सगळ्या घोषणा पोकळ वाटतात. काळानुरूप समाज बदलत आहे. मुलींचे शिक्षणातील योगदान वाढत आहे. पण घरापासून बाहेर राहणाऱ्या मुलींची जबाबदारी कोणावर, कोण घेणार त्यांचे पालकत्व असे अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. महाविद्यालयात होणारे अत्याचार, छेडछाड यामुळे विद्यार्थिनींचे जीवन वेदनादायी झाले आहे. अशावेळी कोणाच्या विश्वासावर आई-वडील मुलींना वसतिगृहात किंवा रुममध्ये राहण्यास सोडतील? हे प्रश्न आज तळागाळातून निर्माण होत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलींना सुरक्षेच्या बाबातीत तरी 'अच्छे दिन' येतील का ?
सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सरपंच, आमदारांपासून ते आकाशात भरारी घेणाऱ्यांमध्ये तिचा समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने एक वेगळी उंची मुलींनी गाठली आहे. पण हे करत असतांना मुलींना सर्वच पातळीवर आजही खस्ता खाव्या लागत आहे. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्ष उलटली तरीही 'स्व' ची ओळख निर्माण करण्यासाठी त्या आजही दहशतीच्या वातावरणात जगत आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ हे वर्ष विद्यार्थिनींच्या दृष्टीने वाईटच गेले असे म्हणावेसे वाटते. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे याकरीता पालक काबाडकष्ट करून, पोटाला चिमटे काढून पैस जमवित मुलींना शिक्षणासाठी परगावी वसतिगृहात ठेवतात. पण, तिच्यावर ओढावलेल्या अत्याचाराच्या प्रसंगामुळे आई-वडिलांच्या पायाखालची जमिनीच सरकते. तिचेही मनोबल हरवते. प्रसंगी आत्महत्यासारख्या मार्ग तिला पत्करावा लागतो, याला जबाबदार कोण? शिकू पाहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे, हे खेदाने म्हणावे लागत आहे.
गेल्यावर्षांपासून मुलींबाबत तीन ते चार घटना दुर्दैवी घडल्यात. यामध्ये खासगी इंन्स्टिट्यूटमध्ये एमबीबीएस करीत असलेल्या मुलीने रॅगिंगला कंटाळून वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यापीठामध्ये निवासाच्या बहाण्याने परदेशी व्यक्ती येऊन राहीला, अन् एका तरुणीला अत्याचाराची शिकार बनविले. तर नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलीला एका मुलाच्या दहशतीने सळू की पळू करून सोडले. गेल्या दोन महिन्यांपासून ती या भीतीच्या सावटाखाली वावरत होती. दरम्यान तिच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. अखेर त्याच्या दहशतीला कंटाळून तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला अन् गावी परतली. खुलेआम कोणीही गुंड, मवाली महाविद्यालयात प्राणघातक हल्ला करतात. त्यावेळी महाविद्यालय प्रशासन काय करते ? मुलींची छेड काढून तिचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार या मवाल्यांना कोणी दिला? या प्रकरणांमध्ये पोलिसांची 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशी भूमिका आरोपींबाबत असायला हवी. या प्रकारांमुळे मुलींच्या शिक्षणापेक्षा संरक्षण महत्त्वाचे वाटणे ही बाब पालकांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे.
महाविद्यालयांमध्ये निर्भया पथक, तक्रार निवारण समित्या कार्यरत असतात. पण मुलींना एवढा मोठ्या प्रमाणात मानसिक छळ होत असतांना या समित्या काय करतात? की केवळ नाव आणि पद मिळविण्याची यांना हौस असते. आज आमच्या मैत्रीणीच्या बाबतीत असे घडले. उद्या आम्हालाही यातून जावे लागेल, अशी भीती आज प्रत्येक महाविद्यालयीन युवतींच्या मनात घोंगावत आहे. तर या प्रकरामुळे पालकांचाही जीव कासावीस होत आहे. माजी राष्ट्रीपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २०२० मध्ये भारत महासत्ता होणार हे स्वप्नं पाहिलं आहे, पण ही स्वप्नपूर्ती होईपर्यंत मुली सुरक्षित राहतील का?
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट