बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच)
रंगपंचमी जवळ येतेय. गेल्या वर्षी आमच्या इमारतीतील काही लहान मुलांना रंग खेळल्यानंतर डोळे चुरचुरणं, डोळ्यांना इजा होणं, असा त्रास झाला होता. त्यामुळे यंदा पालक म्हणून आम्ही मुलांची कशी काळजी घ्यावी?
होळी विशेषतः रंगपंचमीसाठी सगळ्याच मुलांमध्ये उत्साह दिसतोय. पाणी आणि रंग या दोन्ही आवडीच्या गोष्टी असल्याने मुलं फार खुश असतात. पण या सणांमध्ये प्रामुख्याने डोळ्याला, शरीराला इजा होणं, तसंच रासायनिक द्रव्यामुळे त्वचेला किंवा शरीरातील इतर भागावर इजा होणं हे अपघात दिसतात. त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी आपण घेऊ शकतो. रंग खेळताना मूल नजरेआड होणार नाही, याची काळजी घ्या. अगदी लहान मुलं पाण्याच्या साठ्याजवळ किंवा पिंपाजवळ जात नाहीत ना? याकडे लक्ष ठेवा. बिन विषारी आणि नैसर्गिक रंग वापरा. त्यामुळे त्वचेला, डोळ्यांना हानी होत नाही. मुलांना पिचकारी वापरायची पद्धत नीट शिकवा. मुलांनी पिचकारी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या डोळे, कान, आदी नाजूक अवयवांजवळ धरू नये, हे निक्षून सांगा. पावडरचे रंग टाळावेत, पिचकारीतील पाणी उडवताना ते दुसऱ्याच्या नाका-तोंडात जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी. या सर्व नियमावलीबद्दल आग्रही राहणं गरजेचं आहे. रंग खेळायला जाताना मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालणं आवश्यक आहे. शिवाय त्वचेवर रंगाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून अंगावर तेल लावा. यदाकदाचित अपघात झालाच तर प्रथमोपचारचं सामान जवळ ठेवा. नजीकच्या रुग्णालयाचा किंवा डॉक्टरांचा नंबरही जवळ ठेवणं श्रेयस्कर. प्रवास करत असाल तर वाहनाच्या काचा बंद ठेवणं आणि मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन न जाणं हिताचं ठरेल. मुलांना जर त्वचेचे विकार असतील, अॅलर्जीचे विकार असतील तर रंगांपासून सावध राहणं गरजेचं आहे. सध्या स्वाईन फ्ल्यूची साथ पसरली असल्याने मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हात साबणाने स्वच्छ धुणं आणि स्वतःच्या डोळ्याला, चेहऱ्याला, नाकाला हात न लावणं आणि रंग खेळून झाल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ करणं गरजेचं आहे.
शब्दांकन : दीपेश वेदक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट