'पुढच्या महिन्यात दोन दिवस पिकनिकला जायचंय रे. पाच-सहा हजार रुपये तरी लागणार. या महिन्याच्या पगारातून काहीतरी उन्नीसबीस केलं पाहिजे', 'पार्टीला जायचंय. मला तीन हजार देऊन ठेव. पण हे फक्त तुझ्या-माझ्यातच. कळलं का?' दोन मित्रांमध्ये असे संवाद बऱ्याचदा होतात. बरीच नवरे मंडळी अशी आहेत, जी आपला पगार, आर्थिक व्यवहार बायकोपासून 'चोरीछुपे'च करतात. पण केवळ नवरेच नव्हे बरं का. बायकाही यात मागे नाहीत. आपल्या हातात नेमके किती पैसे येतात, आपण ते कसे खर्च करतो हे आपल्या जोडीदारापासून लपवण्याकडे अनेकांचा कल असतो. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
अनेक घरांमध्ये नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असतात. पण आपला पगार, खर्च, गुंतवणूक, उधारी अशा गोष्टी एकमेकांपासून जास्त करून लपवणारेच सापडतील. घरखर्चाची संपूर्ण जबाबदारी खूपदा बायकोकडे असते. त्यामुळे तिच्या मागणीनुसार पैसे द्यायचे अशी काही घरची रीत. पण आपल्या खर्चांचं काय करायचं? पार्टी आहे, पिकनिक आहे, दोस्ताला उधार द्यायचेत. अशावेळी ते बायकोला न सांगितलेलंच बरं असं अनेकांना वाटतं. एवढंच नव्हे, तर पैसे कुठे गुंतवलेत हेही न सांगण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो.
बायकादेखील घरखर्च, आई-वडिलांसाठी, मुलांचं शिक्षण हे सगळं भागल्यावर काही पैसे वेगळे काढून ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यात त्यांची खरेदी लहान- सहान गोष्टींसाठी पैसे ठेवले जातात. पण त्याची वाच्यता नवऱ्याकडे करणं त्या टाळतात. अर्थात, त्यात बऱ्याचदा घरचाच विचार असतो म्हणा. परंतु या लपवाछपवीमुळे अनेक जोडप्यांमध्ये दुरावा येत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर येतंय. बऱ्याचजणांचे ब्रेकअप्स, वादविवाद या व्यवहारांमुळेच होत असल्याचं कळतं.
काय म्हणतो सर्व्हे? १० पैकी १ तरी पुरूष आपलं क्रेडिट कार्ड लपवून ठेवतात.
५६% साथीदार एकमेकांना न सांगताच पैसे खर्च करतात.
३९% स्त्री-पुरुषांना ही आर्थिक लपवाछपवी पटते.
२४% स्त्री-पुरुष आपल्या जोडीदारासोबत आर्थिक विषयांवर चर्चा करणं टाळतात.
२९% लोक झालेल्या खर्चाबाबत घरच्यांना खोटी माहिती देतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट