बऱ्याच भांडणांचं मूळ कारण असतं, कोणी 'सॉरी' न म्हणणं किंवा आपणहून चूक मान्य न करणं. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधेही यामुळेच तणाव निर्माण होतात. त्यात जवळपास सगळी भांडणं व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरच होतात. त्यामुळे नेमकं समोरच्याला काय म्हणायचं आहे, हे लक्षात येत नाही. त्यातून गैरसमज वाढतात. बोलताना समोरचा नक्की कोणत्या सुरात बोलला आहे हे न कळल्यानं सगळे आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून मोकळे होतात. यावर उत्तम उपाय म्हणजे समोरासमोर भेटून गोष्टी स्पष्ट करणं. काही लोकांना तेही जमत नाही. 'जुने विषय पुन्हा कशाला उकरून काढायचे,' 'तो विषय तिथेच संपला होता', अशी काही वाक्यं ठरलेली असतात. तो विषय त्यांच्या दृष्टीनं संपलेला असला, तरी समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल काही बोलायचं असू शकते. नेमकं तेच न समजून घेतल्यामुळे भांडण वाढतं.
काही जणांना त्यांची चूक असली, तरी माफी मागायला आवडत नाही. अशांमुळे ग्रुपमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. माफी न मागण्यामागे ही काही कारणं असावी. महत्त्वाचं कारण म्हणजे इगो. 'मी कशाला सॉरी म्हणू,' हा मुख्य प्रश्न असतो. 'त्यांना गरज असेल, तर ते येतील बोलायला,' हे त्यानंतरचं त्यांचं ठाम म्हणणं असतं. हे नेहमीच झालं की इतर मित्र त्यांना टाळू लागतात. कुणाला त्यांना स्व प्रतिमा जपायची असते. आपण सॉरी म्हणलं, तर त्या प्रतिमेला तडा जाईल, अशी भीती कुठेतरी त्यांच्या मनात असते.
आपण आज सॉरी म्हटलो, तर पुढे सारेजण आपल्या चुका काढत राहतील, अशी एक अनाठायी भीती मनात असते. सॉरी या शब्दाला त्यांच्या दृष्टीनं महत्त्व नसतं. मी येऊन बोलतो किंवा बोलते आहे ना, मग झालं तर. वेगळं सॉरी कशाला, असं त्यांना वाटतं. सॉरी म्हणायला लागू नये म्हणून त्या विषयावर चर्चा न करणं, व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर भांडण झाल्यास तो ग्रुपच सोडून देणं, भांडण झालेल्या व्यक्तीचा क्रमांक उडवून टाकणं, असेही प्रकार केले जातात.
एकाच ग्रुपमधील मित्र-मैत्रिणी कदाचित स्वभाव माहीत असल्यामुळे समजून घेतली; पण बाहेरच्या जगात प्रत्येकजण समजून घेईलच असं नाही. 'दोस्तीत सॉरी आणि थँक यू नसतं,' हे वाक्य म्हणून ठीक आहे.पण नेहमी नेहमी ते चालत नाही. अशाने लोकांची मनं दुखावली जातात. आपले मित्र-मैत्रिणी दूर जाणार असतील, आपण एकटे पडणार असू, तर असा चुकीचा अॅटिट्यूड दूर ठेवायलाच हवा. शेवटी माणसं महत्त्वाची, की आपण स्वतःवर लादलेला अॅटिट्यूड, हे तपासायला हवं. ते एकदा तपासलं आणि खरं काय ते समजून घेतलं, की सॉरी म्हणणं अवघड नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट