नातं जोडलं जाणं आणि ते जपणं ही अत्यंत छान गोष्ट आहे. पण नात्यामध्ये जर सतत एकाच व्यक्तीला तडजोड किंवा त्रास सहन करावा लागत असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे. अशावेळी त्या नात्यात राहायचं की नाही, याचा विचार करणं आणि गरज पडल्यास नातं संपवणंच योग्य ठरतं. नात्याविषयी तुम्ही फेरविचार करावा, हे सुचवणारे हे १२ संकेत
तुमच्या जोडीदाराकडून तुमच्यासोबत सतत जर गैरवर्तन होत असेल. शाब्दीक टोमणे, शारीरिक गैरवर्तन होत असेल, कमीपणाची वागणूक दिली जात असेल तर फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कम्फर्टेबल नाही, त्या गोष्टीची सक्ती तुमच्यावर होत असेल विशेषतः शरीरसंबंधांच्या बाबतीत. तर नक्कीच या नात्याचा पुन्हा विचार करा. कारण अशाप्रकारची जबरदस्ती करणं म्हणजे तुमच्या स्वत्वाचा आदर न करणं.
तुमच्या दिसण्यावरून, रंगरूपावरून तुम्हाला सतत हिणवलं जात असेल, त्यावर विनोद केले जात असतील तर तो जोडीदार योग्य नाही. जो बाह्यरुपावरून तुमची परीक्षा करत असेल तो तुम्हाला आयुष्यभर काय साथ देणार?
तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदाराला प्राधान्य देता पण त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये तुमचा नंबर कायमच शेवटचा असेल तर नक्कीच पुन्हा विचार करा. कारण याचा अर्थ असतो, त्याचं तुमच्याकडे पुरेसं लक्ष नाही.
एकमेकांची सगळी मतं पटली नाही तरी चालतं पण जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि मतांविषयी आदर असायलाच हवा. तो नसेल तर नात्याचा पुर्नविचार नक्की करा.
तुमच्या आयुष्याबद्दल, ते जगण्याच्या कल्पनांविषयी, करिअरविषयी जर जोडीदाराला फार काही वाटत नसेल तो जर नेहमीच या गोष्टींना दुय्यम स्थान देत असेल तर वेळीच विचार करा.
प्रत्येकालाच एक भूतकाळ असतो आणि त्यात प्रत्येकानेच काही ना काही चुका केलेल्या असतात. त्या चुकांतून शिकणं महत्त्वाचं पण तुमचा जोडीदार जर कायम तुमच्या भूतकाळातील चुकांविषयीच टोचून बोलत असेल तर वेळीच शहाण्या व्हा.
तुमच्या जवळच्या व्यक्ती, मित्रमैत्रिणी, भाऊ, कुटुंबिय यांच्यासोबतच्या तुमच्या नात्यावर जर जोडीदाराचा विश्वास नसेल तो या माणसांशी भेटण्यासाठी बंधनं घालत असेल तर ती धोक्याची घंटा आहे.
सहसा सुरुवातीला कुणीच आपल्या घरी किंवा मित्रमैत्रिणींमध्ये आपल्या नात्याविषयी सांगत नाही. पण नात्यात बराच काळ राहिल्यानंतरही जर जोडीदार त्याविषयी विनाकारण गुप्तता पाळत असेल, ते नातं लपवत असेल तर कुठेतरी पाणी नक्की मुरतंय हे लक्षात घ्या.
नातं टिकवायचं तर त्यात विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. जर तो तुमचा फोन, इ मेल्स, मेसेजस यावर लक्ष ठेवत असेल, ते सतत संशयाने तपासून पाहत असेल तर त्याला वेळीच दूर करा.
भांडणं कुठल्याही नात्यात होतातच. पण दरवेळी त्यासाठी तुम्हालाच जर दोषी धरलं जात असेल तर ते चुकीचं आहे. नाते टिकवण्याची जबाबदारी दोघांची आहे.
त्याच्या नोकरीविषयी, कुटुंबाविषयी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना जर तो कायम टाळत असेल तर ते योग्य नव्हे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट