बाप्पासाठी काही पण!
कधी कडाक्याची थंडी, काही वेळेस खूप उन्हाळा तर बऱ्याचदा पावसाची रिपरिप असं लंडनमध्ये अनपेक्षित वातावरण असतं. या वर्षी बाप्पाला कोणता ऋतू अनुभवायला मिळणार हा अंदाज वर्तवणं अशक्यच आहे. तसंच आमच्या इथे गणपतीची मूर्ती भारतातून मागवतात, ती इथे पोहोचेपर्यंत मनात धाकधूक असते. आम्ही जर्सी या छोट्या बेटालगत राहत असल्यामुळे इतर आवश्यक सामानाची खरेदी लंडनमधल्या मुख्य मार्केटमध्ये जाऊन करावी लागते. पण बाप्पासाठी हे सगळं करायला काहीच वाटत नाही. सुट्टी नसली, खूप प्रवास करावा लागला तरीही हे अंतर पार करत मित्रमंडळी गणपतीत भेटायला आवर्जून येतात.
- फाल्गुनी नागले, लंडन
इकाफ्रेंडलीला प्राधान्य
आम्ही इथल्या सॅन डीआगोच्या युनिव्हर्सिटीमध्ये गणपती बसवतो. सध्या इथे बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. सगळे जण अगदी उत्साहात सजावट करण्यात गुंतले आहेत. इथले स्थानिक विद्यार्थी तसंच देश-विदेशातील इथे आलेले विद्यार्थीही आम्हाला या सगळ्यात मदत करतात. शेंदूर काय असतो? दुर्वा म्हणजे काय? हे सगळं जाणून घेण्यांची त्यांची उत्सुकता शब्दांत मांडता येत नाही. तसंच आम्ही इकोफ्रेंडली सजावट करण्यास प्राधान्य देतो. इथल्या गणेशोत्सवाचा वेगळेपणा हाच की इकडे अगदी छोट्या मूर्ती असतात.
- चिन्मय कुलकर्णी, कॅलिफोर्निया
परवानग्या, खरेदीची लगबग
आमच्या कॉलेज हॉस्टेलमध्ये दरवर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. कॉलेजमधल्या आमच्या सीनिअर्सच्या रूममध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतो. या सगळ्यासाठी परवानगी घ्यावी लागते. गणपतीची मूर्ती, सजावटीसाठी भारतीय दुकानांमध्ये जाऊन केलेली समानाची शोधाशोध, पारंपरिक कपडे शोधून ते घालणं अशी एकच लगबग असते. घरापासून लांब असल्यामुळे मित्रंमैत्रिणींसोबत आमचा गणेशोत्सव साजरा होतो. मुंबईतील ढोल-ताशा पथकांचा गजर मिस करते.
- एकता मोहिते, रशिया
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट