मुंबई टाइम्स टीम
muntainbox@gmail.com
l निनाद ठाकूर हे वर्षोनुवर्षं नालासोपारा येथे त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करत आहेत. पण चार वर्षांआधी त्यांना एक कल्पना सुचली ती म्हणजे ड्रेस कोडची! गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना, पण पूर्ण परिवार त्यामुळे एकत्र येत होता. आपल्या परिवाराचं वैशिष्ट्य म्हणून त्यांनी विसर्जनाला एकच ड्रेसकोड ठेवण्याचं ठरवले आणि हीच परंपरा गेली चार वर्षं ते चालवत आहेत. सोबतच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी याच निमित्ताने विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात.
l आपला पारंपरिक सण पारंपरिकरीत्याच साजरा करण्याचा प्रयत्न गोरेगावचे विश्वास शिंदे करतात. सजावट, स्थापना आणि विसर्जन सर्वच पारंपरिक पद्धतीने केलं जातं. घरातल्या घरात नैसर्गिक वस्तूंनी सजावट केली जाते आणि विसर्जन पायी चालत, अभंग गात केलं जातं. सातही दिवस रात्री घरी सर्व फुगड्या, झिम्मा असे पारंपरिक खेळ खेळतात. यानिमित्ताने सारे कुटुंबिय एकत्र येतात आणि मनापासून सणाचा आनंद लुटतात.
l १५० वर्षांपासूनची धुरा सांभाळत घरीच मूर्ती साकारून मालाड येथील दीनानाथ उमरोटकर त्याची स्थापना करतात. कुटुंबाने एकत्र येऊन नैसर्गिकरित्या केलेली सजावट आणि घरातच साकारलेली शाडूची मूर्तीची स्थापना करताना प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत असतो.
l परेल येथील अभिषेक चिटणीस यांची गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत काही वेगळीच आहे. दरवर्षी थीम ठरवून त्याप्रमाणे सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा यांचा प्रयत्न असतो. यावर्षी प्रदूषणाचा प्रभाव लक्षात घेता त्यांनी प्रदूषण थीम ठेवलेली आहे. अर्थात मूर्ती शाडूचीच, सजावट नैसर्गिकरित्या केलेली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट